हिंदू धर्मात प्रत्येक गोष्टीचं विधीविधान सांगितलं गेलं आहे. गर्भसंस्कारापासून ते मृत्यू झाल्यानंतर पूजा विधी सांगितल्या गेल्या आहेत. भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्ष हा पितरांना समर्पित पंधरवडा आहे. या पंधरवड्यात तिथीनुसार तर्पण केलं जातं. तसेच त्यांच्या आवडीचं जेवण करून ते पितरांना दिलं जातं. पितरांचं ऋण फेडण्यासाठी हा कालावधी खूपच महत्त्वाचा आहे. पितृपक्षात पूर्वज कावळ्याच्या रुपाने येतात अशी समज आहे. कावळ्यांना पितरांचा दर्जा दिला गेला आहे. त्यामुळे या काळात पितरांच्या रुपाने कावळ्यांना जेवण दिलं जातं. पण कावळाच का? इतरही पक्षी आहेत. असं असूनही कावळ्यांना मान देण्याचं कारण काय? असे एक ना अनेक प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. धार्मिक ग्रंथ आणि हिंदू मान्यतांनुसार, पितरांची आत्मा कावळ्याचे रुपाने त्यांच्या नातलगांकडून भोजन आणि पूजा मान घेतात. श्राद्ध आणि पितृपक्षात ही मान्यता प्रचलित आहे.
कावळ्याला पितरांचा मान का दिला जातो?
गरुड पुराणानुसार, कावळ्याला यमाचं प्रतिक मानल गेलं आहे. यमदेवाने कावळ्याला दिलेलं जेवण दिल्यानंतर पितरांना पोहोचेल, असं वरदान दिलं आहे. त्यामुळे श्राद्ध किंवा पितृपक्षात कावळ्याने भोजन केलं तर पितरांची आत्मा संतुष्ट होते. इतकंच काय तर यमराजही प्रसन्न होतात. कावळा न थकता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करतो. त्यामुळे त्याच्या शरीरात कोणत्याही प्रकारची आत्मा वास करू शकते अशी मान्यता आहे. त्यामुळे त्याला संदेशवाहक म्हणूनही गणलं जातं. जेवण दिल्यानंतर कावळ्यानी त्याला शिवलं नाही तर पितरं नाराज असल्याचे संकेत मिळतात.
पितृपक्षात कावळ्याशी निगडीत पौराणिक कथा काय?
पौराणिक कथेनुसार, त्रेतायुगात इंद्रादेवाच पूत्र जयंतने सर्वात प्रथम कावळ्याचं रुप धारण केलं होतं. विष्णु अवतार असलेल्या प्रभु राम पृथ्वीतलावर अवतार कार्य पूर्ण करत होते. तेव्हा जयंतने कावळ्याच्या रुपाने माता सीतेच्या पायावर चोच मारली होती. तेव्हा प्रभू रामांनी गवताच्या तृणाचा बाण मारत जयंतचा डोळा फोडला होता. तेव्हा त्याने प्रभू रामांची माफी मागली. त्यानंतर प्रभू रामांनी त्याला वरदान दिलं की तुला अर्पित केलेलं भोजन पितरांना मिळेल. तेव्हापासून कावळ्याला श्राद्धात जेवण देण्याची परंपरा सुरु झाली. पितृपक्षात पहिलं जेवण कावळ्याला दिलं जातं.
(Disclaimer : ही माहिती पुराण, धार्मिक ग्रंथ, ज्योतिषशास्त्र आणि मान्यतेवर आधारीत आहे. MahaMarathiNews.com या माहितीचं समर्थन किंवा पुष्टी करत नाही.)