भारतात गेल्या काही दिवसात शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचं प्रमाण वाढलं आहे. खरं तर अनेकांना हे माध्यम झटपट पैसे कमवण्याचं साधन वाटत आहे. पण मार्केटचा अभ्यास नसेल तर मोठं नुकसानही होऊ शकतं. शेअर मार्केटमध्ये ताकही फुंकून प्यायचं असतं. शेअर मार्केटमध्ये बीएसई आणि एनएसई हे प्रमुख एक्सचेंज आहेत. या दोन्ही एक्सचेंजनी या वर्षीच्या मुहूर्त ट्रेडिंगची तारीख आणि वेळ जाहीर केली आहे. मुहूर्त ट्रेडिंगला सहा दशकांची परंपरा आहे. बीएसईने 1957 मधये मुहूर्त ट्रेडिंगची सुरुवात केली होती. तर एनएसईने 1992 मध्ये मुहूर्त ट्रेडिंगला सुरुवात केली. खरं तर सुट्ट्यांच्या दिवशी शेअर मार्केट बंद असतं. पण दिवाळीत एका दिवसाठी दोन्ही प्रमुख एक्सचेंज एका तास ट्रेडिंगसाठी खुले असतात. बीएसईने 1 नोव्हेंबर रोजी लक्ष्मी पूजनादिवशी मुहूर्त ट्रेडिंग असेल असं जाहीर केलं आहे. संध्याकाळी 6 ते 7.10 पर्यंत शेअर बाजार मुहूर्त ट्रेडिंगसाठी खुलं असणार आहे. या वेळेत शेअर्सची खरेदी विक्री करता येणार आहे.
मुहूर्त ट्रेडिंगला इतकं महत्व का आहे?
भारतीय गुंतवणूकदार दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाला नवं आर्थिक वर्षाची सुरुवात मानतात. दिवाळीला खरेदी केल्याने समृद्धी आणि भरभराट होते असा समज आहे. वर्षभर देवी लक्ष्मीची कृपा राहते अशी श्रद्धा आहे. त्यामुळे गुंतवणूकदार या दिवशी शेअर खरेदी करणं पसंत करतात. खासकरून या दिवशी लाँग टर्म शेअर खरेदी करण्यावर जोर असतो. दीर्घ कालावधीत जास्त परतावा मिळावा हा हेतू असतो. या तासाभरात किरकोळ गुंतवणूकदार आवडीचे शेअर्स खरेदी करतात आणि पोर्टफोलिओचा विस्तार करतात. आर्थिक सल्लागाराशी चर्चा करून शेअर्समध्ये गुंतवणूक करावी.
मुहूर्त ट्रेडिंगमध्ये नेमकं काय काय होतं?
मुहूर्त ट्रेडिंगमध्ये तुम्ही रोज शेअर्सची खरेदी विक्री करता अगदी तसंच होतं. यात ब्लॉक डील सेशन, प्री ओपन सेशन, सामान्य बाजार सेशन, ऑक्शन सेशन आणि क्लोजिंग सेशन असते. विशेष म्हणजे मुहूर्त ट्रेडिंगमध्ये इंट्राडे करू शकता. या व्यतिरिक्त फ्यूचर अँड ऑप्शन्सस आणि म्युचूअल फंड्सही विकत घेता येतात.