एबी फॉर्म म्हणजे काय असतं रे भाऊ! पक्ष नेता त्यासाठी इतका काकुळतीला का येतो? जाणून घ्या महत्त्व

निवडणुकीचा काळ सुरु झाला की एबी फॉर्मची चर्चा सुरु होते. एबी फॉर्म मिळेपर्यंत पक्ष कार्यकर्तापासून नेत्याची धाकधूक वाढलेली असते. पक्षश्रेष्ठींचे उंबरठे झिजवून अखेर एबी फॉर्म हाती पडला की जीव भांड्यात पडतो. पण या एबी फॉर्ममध्ये नेमकं असतं तरी काय? एबी फॉर्ममुळे काय फरक पडतो ते जाणून घेऊयात.

0
4
Election_AB_Form

पाच वर्षे आरोपप्रत्यारोप आणि मतदार संघ पिंजून काढल्यानंतर निवडणुकीला उभं राहण्याची वेळ होते. पण उमेदवारीचं तिकीट मिळवण्यासाठी बरेच दावेदार असतात. त्यामुळे एकाच वेळी मतदार संघातून बरेच उमेदवार उच्छुक असतात. पक्षाचं काम आम्ही प्रामाणिकपणे केलं आहे आणि आम्हालाच तिकीट मिळावं असं अट्टाहास असतो. त्यामुळे प्रत्येक जण पक्षाकडे आपल्या भागातून तिकीटासाठी आग्रही असतो. त्यामुळे पक्षाकडून एबी फॉर्म कोणाला मिळणार याची धाकधूक असते. पण हा एबी फॉर्म म्हणजे काय असतो आणि त्यासाठी एवढा सर्व खटाटोप करण्याचं कारण काय? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. तुम्हालाही असाच प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर तुम्हाला पुढे मिळेल.

पक्षाकडून एबी फॉर्म मिळालेला उमेदवार हा त्या पक्षाचा अधिकृत उमेदवार मानला जातो. त्याला संबधित पक्षाचं चिन्ह दिलं जातं. त्यामुळे निवडणूक आयोगाकडे विविध कागदपत्रांसह हा एबी फॉर्म दाखल करणं महत्त्वाचं असतं. एबी फॉर्मव्यतिरिक्त कागदपत्रांमध्ये नागरिकत्वाचा दाखला, वय आणि जातीचं प्रमाणपत्र (सदर जागा राखीव असेल तर), फौजदारी गुन्ह्यांची माहिती, उमेदवार आणि त्याच्या कुटुंबियांच्या संपत्तीची माहिती आणि रोख रक्कमेचा तपशील द्यावा लागतो. एबी फॉर्ममध्ये ए आणि बी असे दोन फॉर्म एकत्र असतात.

ए फॉर्ममध्ये पक्षाचा उमेदवार असून सदर पक्षाची राष्ट्रीय किंवा राज्यस्तरावर नोंदणी आहे. या फॉर्ममधून सदर पक्षाची माहिती निवडणूक आयोगाला दिली जाते. हा फॉर्म पक्षाचे अध्यक्ष किंवा सचिवाकडून उमेदवाराला दिला जातो. यावर पक्षाचा शिक्का आणि पक्ष अध्यक्षाची सही असणं आवश्यक आहे. यावर उमेदवाराचे नाव, पक्षातील पद आणि चिन्ह यांची माहिती असते.

दुसरीकडे, बी फॉर्मवर पक्षाच्या अधिकृत उमेदवारासह आणखी एका उमेदवाराचं नाव असतं. काही कारणास्तव पहिल्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला तर दुसऱ्या उमेदवाराला संधी मिळते. म्हणजेच निवडणूक आयोग दुसऱ्या उमेदवाराला पक्षाचं नाव, चिन्ह देते. असं असलं तरी एखादा अपक्ष उमेदवारही अधिकृत उमेदवार होऊ शकतो. अपक्ष उमेदवार ए फॉर्म भरतो. पण अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पक्षाने बी फॉर्म दिला तर तो त्या पक्षाचा अधिकृत उमेदवार होऊ शकतो. दरम्यान, राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी एए आणि बीबी फॉर्म दिले जातात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here