मराठी भाषेला अखेर अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे एक दशकाहून अधिक काळापासून सुरु असलेल्या लढ्याला पूर्णविराम मिळाला आहे. आता मराठी भाषा जागतिक पातळीवर समृद्ध होण्यास आणखी मदत मिळणार आहे. खरं तर अभिजात या शब्दाचा सोप्या शब्दात अर्थ सांगायचा तर सर्वात जुनी भाषा.. निकषानुसार त्या भाषेला जवळपास एक ते दीड वर्षांचा इतिहास असणं गरजेचं आहे. त्यासाठी त्या संदर्भातले ठोस पुरावे सादर करता आले पाहिजेत. केंद्र सरकारच्या निकषात जर पुरावे योग्य ठरले तरच त्या भाषेला अभिजात हा दर्जा मिळतो. प्राचीन साहित्य, ग्रंथ परंपरा आणि एका पिढीतून दुसऱ्या पिढीपर्यंत हा वसा आला असेल. या व्यतिरिक्त कविता, शिलालेख आणि जुन्या नोंदी असणं आवश्यक आहे. मराठी ही भाषा या सर्व निकषावर खरी उतरली आहे.
मराठी भाषेसह एकूण पाच भाषांना यंदा अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. यात पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली या भाषांना अभिजात भाषेचा पंगतीत स्थान मिळालं आहे. यापूर्वी सहा भाषांना अभिजात हा दर्जा मिळाला होता. त्यामुळे भारतात अभिजात भाषा म्हणून एकूण 11 भाषांना मान मिळाला आहे. केंद्र सरकारने 12 ऑक्टोबर 2004 रोजी अभिजात भाषेबाबत प्रस्ताव पास केला होता. त्यानुसार पहिल्याच वर्षी अभिजात भाषेच्या निकषात तामिळ ही भाषा बसली आणि पहिला मान मिळाला.
2005 या वर्षी संस्कृत, 2008 या वर्षी कन्नड आणि तेलुगु, 2013 मध्ये मल्याळम आणि 2014 या वर्षी ओडिया या भाषेला या पंगतीत स्थान मिळालं. त्यानंतर इतर प्रादेशिक राज्यांनी आपल्या भाषेला अभिजात हा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न सुरु केले. 2012 साली महाराष्ट्र सरकारने प्राध्यापक रंगनाथ पाठारे यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली. या समितीने सखोल अभ्यास करून मराठी ही अभिजात भाषा असल्याचा अहवाल सरकारकडे सोपवला. त्यानुसार राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. मराठी ही भाषा अडीच हजार वर्षे जुनी असल्याचं या अहवालात सांगण्यात आलं आहे. त्यामुळे मराठी भाषेचा झेंडा आणखी घट्ट रोवला गेला.
अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने आता भाषा संवर्धनसाठी मोठी निधी उपलब्ध होणार आहे. मराठी शाळांना खऱ्या अर्थाने यामुळे बळ मिळणार आहे. गेल्या काही वर्षात मराठी शाळांकडे विद्यार्थ्यांची संख्या रोडावली होती. मात्र आता मराठी भाषेला जागतिक पातळीवर स्थान, संशोधनाला चालना मिळणार आहे. विद्यापीठांना मराठी भाषेचं अभ्यास आणि जतन करण्याासाठी प्रेरणा मिळणार आहे. तसेच मराठी भाषेसाठी मेहनत घेणाऱ्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पुरस्कार देखील मिळणार आहेत.