PAN Card 10 digit meaning : पॅनकार्ड हे आर्थिक व्यवहार करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण कागदपत्र आहे. भारतात प्रत्येक व्यक्तिला हे कार्ड अनिवार्य आहे. बँकेत खातं उघडण्यापासून सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी पॅनकार्डचा वापर केला जातो. पॅनकार्डवर स्वत:च नाव, वडिलांचं नाव, जन्म तारीख, सही, फोटो आणि हस्ताक्षर यांची नोंद असते. पॅनकार्ड हे एखाद्या व्यक्तीचं आर्थिक ओळखपत्र असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. पॅनकार्डचा वापर हा बँक खातं उघडण्यासाठी, टॅक्स भरण्यासाठी, गुंतवणूक करण्यासाठी आणि इतर कामांसाठी केला जातो. तसेच आर्थिक फसवणूक आणि कर चुकवेगिरी रोखण्यासाठी आयकर विभागाला सोपं जातं. एका क्लिकवर आर्थिक व्यवहाराची माहिती समोर येते. पॅनकार्डचा अर्थ परमनंट अकाउंट नंबर असा होता. या कार्डवर 10 अल्फान्यूमेरिक नंबर असतात. म्हणजेच अक्षरं आणि अंकांची एक विशिष्ट सांगड घातलेली असते. पण या दहा अंकांचा अर्थ बऱ्याच जणांना माहितीच नसतो. या दहा अंकांमध्ये तुमच्याशी निगडीत एक माहिती असते. चला जाणून घेऊयात याबाबत
पॅनकार्डच्या दहा अंकांचा अर्थ समजून घ्या
पॅनकार्ड तयार करण्यासाठी जेव्हा तुम्ही अर्ज करता तेव्हा तुमच्याशी निगडीत माहिती त्या अर्जात नमूद करता. त्या आधारे पॅन नंबर तयार होतो. पहिली तीन अक्षरं ही इंग्रजी अल्फाबेट्स असतात AAA पासून ZZZ पर्यंत कोणतंही लेटर असू शकतं. सध्या कोणती सीरिज चालू आहे यावर अवलंबून असतं. तर चौथं अक्षर हे करदात्याची श्रेणी दर्शवते. म्हणजेच तुम्ही कोणत्या श्रेणीत मोडता हे चौथ्या अक्षरावरून दिसतं. तुमचं कार्ड बघाल तर तुम्हाला चौथं अक्षर हे P दिसेल. याचा अर्थ वैयक्तिक व्यक्ति असा होतो. P म्हणजे पर्सनल.. पण जर हे कार्ड कंपनीचं असेल तर चौथं अक्षर हे C असतं. C म्हणजेच कंपनी.. F म्हणजे फर्म, A म्हणजे असोसिएशन ऑफ पर्सन, T म्हणजे ट्रस्ट, B बॉडी ऑफ इंडिविज्युअल, H म्हणजे हिंदू अनडिवायडेड फॅमिली, Lलोकल, J आर्टिफिशियल ज्युडिशिअर पर्सन, G म्हणजे गर्व्हनमेंटसाठी असतो.
पॅनकार्डमधील पाचवं अक्षर काय सांगते?
आता आपण पाचव्या अक्षरावर येऊयात.. हे अक्षर तुमचं अडनाव दर्शवतं. तुमचं अडनाव संत असेल S, वायंगणकर असेल तर V..पाच अक्षरानंतरचे पाच अंक आणि अक्षरं हे आयकर विभागाकडून निश्चित केले जातात. पॅनकार्डचे काही प्रकार आहेत. भारतीय नागरिकांसाठी आणि विदेशी नागरिकांसाठी वेगवेगळे पॅनकार्ड तयार केले जातात. भारतीय नागरिकांना पॅनकार्ड बनवण्यासठी फॉर्म नंबर 49A भरावा लागतो. तर विदेशी नागरिकांना यासाठी 49AA भरावा लागतो. तसेच बिझनेससाठी वेगळं पॅनकार्ड बनवावं लागतं.