वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-2025 पर्वात श्रीलंका आणि न्यूझीलंड हे दोन संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्यातील पहिला सामना गॅले आंतरराष्ट्रीय मैदानात होत आहे. पण हा कसोटी सामना पाच दिवसांऐवजी सहा दिवसांचा झाला आहे. या मालिकेच्या तिसऱ्या दिवशी ब्रेक दिला गेला. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पाऊस नाही, वातवरणही खराब नाही, असं असूनही एक दिवसांची विश्रांती का? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. खरं तर 16 वर्षानंतर कसोटी क्रिकेटमध्ये असा दिवस आला आहे. त्यामुळे या विश्रांतीबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. नेमकं 16 वर्षानंतर असं काय घडलं की, आराम देण्याची वेळ आली. चला तर या मागचं कारण समजून घेऊयात
श्रीलंकेत मध्यंतरी राजकीय उलथापालथ झाली होती. त्यानंतर बऱ्याच घडामोडी घडल्या. 2022 नंतर देशात पहिल्यांदाच मतदान प्रक्रिया पार पडली. त्या अनुषंगाने श्रीलंकेत कसोटी सामन्यादरम्यान राष्ट्रपती निवडणूक होती. तसेच श्रीलंका आणि न्यूझीलंड दौरा पूर्वनियोजित होता. त्यामुळे निवडणुकीच्या दिवशी एक दिवसाचा आराम दिला गेला. जेणेकरून श्रीलंकन क्रिकेटपटू आणि अधिकाऱ्यांना संबंधित मतदानाच्या दिवशी जाण्याची परवानगी मिळावी. मतदानाच्या दिवशी संघाला कोलंबोत मतदानाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच काही खेळाडूंना मतदानासाठी लांबचा पल्ला गाठावा लागला.
वेगवान गोलंदाज असिथा फर्नांडो याला 175 किमी प्रवास करून गावात जाऊन मतदान करावं लागलं. तर लाहिरु कुमाराला गॅले मैदानापासून 225 किमी प्रवास करून मतदान करावं लागलं. आता श्रीलंकेत निवडणूक प्रक्रिया पार पडली असून राष्ट्रपतीची निवडही निश्चित झाली. डाव्या पक्षाचे अनुरा कुमारा दिससानायके श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती होणार हे निश्चित झालं आहे. ते श्रीलंकेचे दहावे राष्ट्रपती असणार आहेत.
दुसरीकडे, न्यूझीलंडला कसोटी विजयासाठी अवग्या 68 धावांची गरज आहे. पण हातात फक्त दोन गडी असल्याने विजय मिळवणं खूपच कठीण असणार आहे. रचिन रविंद्रने एका बाजूने मोर्चा सांभाळला असून त्याने 158 चेंडूत नाबाद 91 धावा केल्या आहेत. तर एजाज पटेल 0 या धावसंख्येवर खेळत आहे. त्यामुळे काहीही होऊ शकतं.