शहापूर, मुरबाड : “म्हशाची जत्रा”… घोंगडी, कोंबडी आणि जनावरांचा बाजार… म्हशाच्या यात्रेची ही खास वैशिष्ट्ये. पौष पौर्णिमेला म्हसा या मुरबाड तालुक्यातल्या छोट्याशा गावात ही यात्रा भरते. या यात्रेला अडिचशेहून अधिक वर्षांची परंपरा आहे. पूर्वी घाटावरुन मोठ्या प्रमाणात शेतकरी, धनगर आपल्या जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी म्हसा या गावी यायचे. अगदी काही दशकांपर्यंत यात्रेत हे व्यवहार चालत असत. दीड-दोन लाखांपर्यंत उमदा बैल विकला जाई. मात्र जसजसं शेतीचं प्रमाण घटलं, यांत्रिकीकरण झालं तसा बाजारात होणारी जनावरांची खरेदी विक्री रोडावली. म्हसोबा या शंकराच्या मंदिराजवळ सहा ते आठ एकरात ही जत्रा आजही तेवढ्याच उत्साहात भरते हे विशेष. म्हसोबा देवाच्या नावावरूनच गावाला म्हसा हे नाव पडलं. ही झाली यात्रा आणि म्हसोबाची ओळख. आता खांबलिंगेश्वर म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. असं नाव असण्याचं कारण काय? वगैरे वगैर..
खांबलिंगेश्वर असं नाव असण्याचं कारण काय?
खांबलिंगेश्वर म्हणजेच शिवलिंग. शिवलिंग आपण नेहमी दगडाचे पाहतो. मात्र तीर्थक्षेत्र म्हसोबा या मंदिराजवळ चक्क लाकडाचं शिवलिंग आहे. तेही उंच सरळ सोट लाकडी खांबाचं. म्हसोबा मंदिराच्या आवारात एका कोपऱ्यात एक चौथरा नजरेस पडतो. त्याच्या मधोमध एक पितळी खांब गेल्या कित्येक शतकांपासून उभा आहे. पूर्वी हा लाकडी खांब होता. आता याला पितळी मुलामा दिलाय. याच खांबलिंगेश्वराची भाविक मोठ्या श्रद्धेने पूजा करतात.
म्हसोबा देवावर भविकांची श्रद्धा
म्हसोबाचे हे देवस्थान जागृत आहे, असं पंचक्रोशीतले लोक मानतात. त्यामुळे वर्षभर खांबलिंगेश्वराला भाविक येऊन दर्शन घेतात आणि पौष पौर्णिमेला इच्छापूर्ती केली जाते. जे भाविक नारळाची तळी देवाला अर्पण करतात. पूर्वी यात्रा १० ते १३ दिवस चालायची. तमाशाचे फड रंगायचे, कुस्त्या खेळल्या जायच्या. मात्र आता ही यात्रा आठ दिवसात आटोपली जाते. या यात्रेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे म्हशाची यात्रा आली की थंडीचा कडाका वाढतो. त्यामुळे यात्रेत उबदार कपडे, धनगरी घोंगड्याही विक्रीला येतात. ८ दिवस चालणाऱ्या या यात्रेत शेतीची अवजारं तसंच घरातली प्रत्येक वस्तू तुम्हाला मिळेल. श्रावणी सोमवारी सुद्धा या ठिकाणी मोठी गर्दी असते. मंदिराच्या आवारात लग्नकार्य तसेच इतर मंगल कार्ये होतात. इथली निरव शांतता, निसर्ग रम्य परिसर यामुळे म्हसोबाच्या मंदिरात कमालीचा प्रसन्न वाटतं.