महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. राज ठाकरे यांच्या पक्षाने विधानसभेसाठी कोणत्याही पक्षासोबत युती किंवा आघाडी केलेली नाही. 2014 विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांना घवघवीत यश मिळालं होतं. मात्र 2019 विधानसभा निवडणुकीत सर्व फासे उलटे पडले आणि एकमेव आमदार निवडून आला. त्यामुळे यंदा राज ठाकरे युती आघाडी करतील की नाही याकडे महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष लागून होतं. पण मनसेने कोणाशीही युती आघाडी न करता 45 जणांची उमेदवारी जाहीर केली आहे. या यादीत राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांचं नाव आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आहे. अमित ठाकरे यांना माहिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान शिंदेंच्या शिवसेनेनेही 2024 निवडणुकीसाठी माहिममधून उमेदवार दिला आहे. विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना तिकीट दिलं आहे. त्यामुळे अमित ठाकरे विरुद्ध सदा सरवणकर असा सामना रंगणार आहे. दुसरीकडे, मनसेने आदित्य ठाकरे यांच्याविरोधात उमेदवार दिला आहे. मागच्या निवडणुकीत राज ठाकरेंनी उमेदवार देणं टाळलं होतं. मात्र यंदाच्या निवडणुकीत उमेदवार दिला आहे. मनसेचे शिलेदार संदीप देशपांडे आदित्य ठाकरेंविरोधात रिंगणात असतील.
2019 विधानसभा निवडणुकीत माहिममध्ये काय होती स्थिती?
माहिम विधानसभा मतदारसंघातून 2019 विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे सदा सरवणकर निवडून आले होते. त्यांना 61,337 मतं पडली होती. तर मनसेच्या संदीप देशपांडे यांना 42,690 मत पडली होती. काँग्रेसच्या प्रवीण नाईक यांना 15246 मतं, अपक्ष मोहनिश रवींद्र राऊल यांना 843 मतं, तर नोटाला 3912 मतं पडली होती. या मतदार संघात मागच्या निवडणुकीत 1 लाख 24 हजार 28 लोकांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
वरळी विधानसभेत आदित्य ठाकरेंना संदीप देशपांडेंचं आव्हान
आदित्य ठाकरे निवडून आलेल्या वरळी मतदार संघात 2019 विधानसभा निवडणुकीत एकूण 14 उमेदवार रिंगणात उतरले होते. या मतदार संघात मागच्या निवडणुकीत मनसेने उमेदवार दिला नव्हता. मात्र यंदाच्या निवडणुकीत संदीप देशपांडे यांना तिकीट दिलं आहे. उद्धव ठाकरे गटाच्या आदित्य ठाकरे यांना 89248, बसपाच्या विश्राम पडाम यांना 1932, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेश माने यांना 21821, वंचित बहुजन आघाडीच्या गौतम गायकवाड यांना 6572, प्रहार जनशक्ती पार्टिच्या प्रताप हवालदार यांना 456, बीएमएसएण पक्षाच्या किसन बनसोडे यांना 179, त्यानंतर अपक्ष अभिजीत बिचुकलेला 781, अपक्ष नितीन गायकवाड यांना 160, अपक्ष महेश खांडेकर यांना 236, अपक्ष मिलिंद कांबळे यांना 115, अपक्ष मंगल राजगोर यांना 247, अपक्ष रुपेश तुर्भेकर यांना 829, अपक्ष विजय शिकतोडे यांना 193 आणि नोटाला 6305 मत पडली होती. वरळी मतदारसंघात एकूण 1 लाख 29 हजार 74 लोकांनी मतदान केलं होतं.
आगामी विधानसभा २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची दुसरी यादी खालीलप्रमाणे….#MNSAdhikrut #विधानसभा_२०२४ pic.twitter.com/gmBAIzsfRb
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) October 22, 2024
मनसेकडून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात कोण?
- अमित राज ठाकरे, माहीम
- शिरीष सावंत, भांडुप पश्चिम
- संदीप देशपांडे, वरळी
- विश्वजित ढोलम, विक्रोळी
- गणेश चुक्कल, घाटकोपर पश्चिम
- संदीप कुलथे, घाटकोपर पूर्व
- माऊली थोरवे, चेंबूर
- संदेश देसाई, वर्सोवा
- महेंद्र भानुशाली, चांदिवली
- भालचंद्र अंबुरे, जोगेश्वरी पूर्व
- विरेंद्र जाधव, गोरेगाव
- भास्कर परब, दिंडोशी
- महेश फरकासे, कांदिवली पूर्व
- दिनेश साळवी, चारकोप
- नयन कदम, मागाठाणे
- कुणाल माईणकर, बोरीवली
- राजेश येरुणकर, दहिसर
- संदीप राणे, मिरा-भाईंदर
- विनोद मोरे, नालासोपारा
- अविनाश जाधव, ठाणे शहर
- प्रमोद (राजू) पाटील, कल्याण ग्रामीण
- मनोज गुळवी, भिवंडी पश्चिम
- सुशांत सुर्यराव, मुंब्रा-कळवा
- संगिता चेंदवणकर, मुरबाड
- हरिश्चंद्र खांडवी, शहापूर
- जगदीश खांडेकर, मानखुर्द-शिवाजीनगर
- निलेश बाणखेले, ऐरोली
- गजानन काळे, बेलापूर
- किशोर शिंदे, कोथरूड
- साईनाथ बाबर, हडपसर
- मयुरेश वांजळे, खडकवासला
- प्रमोद गांधी, गुहागर
- रवींद्र कोठारी, कर्जत-जामखेड
- कैलास दरेकर, आष्टी
- मयुरी बाळासाहेब मस्के, गेवराई
- शिवकुमार नागराळे, औसा
- डॉ. अनुज पाटील, जळगाव शहर
- प्रवीण सूर, वरोरा
- महादेव कोगनुरे, सोलापूर दक्षिण
- रोहन निर्मळ, कागल
- वैभव कुलकर्णी, तासगांव-कवठे महाकाळ
- संजय शेळके, श्रीगोंदा
- विजयराम किनकर, हिंगणा
- आदित्य दुरुगकर, नागपूर दक्षिण
- परशूराम इंगळे, सोलापूर शहर-उत्तर