सुकन्या समृद्धी योजना ही लोकप्रिय योजना आहे. या योजनेत मुलींचं वय 21 झाल्यानंतर एक चांगला परतावा हाती येतो. त्यामुळे या योजनेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत मुलीचं खातं सुरु करायचं असेल तर फक्त एकच अट आहे. ती म्हणजे मुलीचं वय हे 10 वर्षापेक्षा कमी असायला हवं. जर मुलीचं वय 10 वर्षापेक्षा जास्त झालं असेल तर या योजनेचा लाभ घेता येत नाही. या योजनेंतर्ग सध्यातरी 7.6 टक्के व्याज मिळतो. भविष्यात यात वाढही होऊ शकते.या खात्यात वर्षाला कमीत कमी 250 रुपये आणि जास्तीत जास्त 1.50 रुपये गुंतवता येतात. ही योजना मुलीचं वय 21 झाल्यानंतर मॅच्युअर होते. म्हणजे या योजनेचा लॉक इन कालावधी हा मुलीच्या 21 वर्षापर्यंत असतो. खातं सक्रिय ठेवण्यासाठी किमान 15 वर्षे गुंतवणूक करणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ, मुलीच्या जन्मावेळी तुम्ही हे खातं सुरु केलं. दर वर्षी तुम्ही ठरलेली रक्कम भरली आणि मुलीच्या वयाच्या 16 व्या वर्षांपासून रकम भरता आली नाही. तर मुलीच्या 21व्या वर्षी आधीच्या गुंतवणुकीवर परतावा मिळेल.
मुलीच्या जन्मापासून सुकन्या समृद्धी योजना सुरु केली तर फायदा
मुलीच्या जन्मानंतर तात्काळ सुकन्या समृद्धी योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला, तर मोठी रक्कम जमा करता येईल. तुमची मुलगी जेव्हा 21 वर्षांची होईल तेव्हा तुमच्या हातात एक चांगली रक्कम असेल. मुलीच्या जन्मापासून दरमहा जर 1000 रुपयांची गुंतवणूक करत असाल तर किती रक्कम जमा होईल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर पुढे आहे.
दरमहा 1000, 2000 रुपये गुंतवले तर किती परतावा मिळणार?
सुकन्या समृद्धी योजनेत तुम्ही दरमहा 1000 रुपये जमा केले तर वर्षाला 12 हजार रुपये जमा होतील. सुकन्या समृद्धी योजनेच्या सध्याच्या व्याजदरानुसार गणित करून पाहू. 15 वर्षात 1 लाख 80 हजार रुपये जमा होतील. या रकमेवर तुम्हाला 3,29,212 रुपये व्याज मिळेल. म्हणजेच मॅच्युरिटीवेळी एकूण 5 लाख 9 हजार 212 रुपये मिळतील.
प्रतिमहा 2000 हजार रुपयांच्या गुंतवणुकीत वार्षिक 24 हजार रुपये जमा होतील. म्हणजेच 15 वर्षात तुम्ही 3 लाख 60 हजार रुपये गुंतवणूक कराल. यावर तुम्हाला सध्याच्या व्याजदरानुसार 6 लाख 58 हजार 425 रुपय मिळतील. म्हणजेच मॅच्युरिटीवेळी तुम्हाला 10 लाख 18 हजार 425 रुपये मिळतील.
प्रतिमहा 3000 रुपयांची गुंतवणूक केली तर वार्षिक 36 हजार आणि 15 वर्षात 5 लाख 40 हजार रुपये जमा होतील. यावर 9 लाख 87 हजार 637 व्याजदर मिळेल. मॅच्युरिटीवेळी ही रक्कम 15 लाख 27 हजार 637 रुपये असेल.
प्रतिमहा 4000 रुपयांची गुंतवणूक केली तर 15 वर्षात 7 लाख 20 हजा रुपये जमा होतील. यावर 13 लाख 16 हजार 850 रुपये व्याज मिळेल. मॅच्युरिटीवेळी 20 लाख 36 हजार 850 रुपये मिळतील. प्रतिमहा 5000 रुपयाच्या गुंतवणुकीवर 15 वर्षात 9 लाख रुपये जमा होतील. त्यावर 16 लाख 46 हजार 062 व्याज मिळेल. मॅच्युरिटीवेळी 25 लाख 46 हजार 062 रुपये मिळतील.