गेल्या काही दिवसात विमानाने प्रवास करणं म्हणजे जीव मुठीत घेऊन जाण्यासारखं झालं आहे. देशांतर्गत विमान प्रवास असो की आंतरराष्ट्रीय, गेल्या काही दिवसात वारंवार प्लेनमध्ये काही असल्याच्या धमक्या मिळत आहेत. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करूनही चालणार नाही. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा डोळ्यात तेल घालून तपास करत आहेत. त्यामुळे एखाद्या उड्डाण घेतलेल्या विमानाचं आपतकालीन लँडिंग करावं लागतं. या सर्व घडामोडीत प्रवाशांचा जीव वेठीस असतो. छोट्या विमानात 78, तर मोठ्या विमानात 180-232 प्रवाशी असतात. नेमकं काय होईल याचा त्यांनाही अंदाज नसतो. इतकंच काय तर ठरलेल्या ठिकाणी वेळेत पोहोचताही येत नाही. असं सर्व होत असताना धमकीचा फोन आल्यापासून ते सर्व प्रक्रियेत जवळपास 3 ते 4 कोटी रुपयांचा चुराडा होतो. धमकीचा कॉल आल्यानंतर सुरक्षा यंत्रणा कामाला लागतात. तसेच आरोपींचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरु होता. आयपी अॅड्रेसच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेण्यासाठी प्रयत्न केला जातो. यात कोट्यवधी रुपयांची वाताहत होते. या प्रक्रियेत सात ते आठ तास लागू शकतात. यावेळी सात ते आठ अग्निशमन दलाच्या गाड्या, रुग्णवाहिका, बॉम्ब निकामी करणारं पथक, राज्य पोलीस यंत्रणा आणि प्रवाशांसाठी लवकरात लवकर वैद्यकीय सुविधा मिळाव्या यासाठी जवळच्या रुग्णालयांना सज्ज केलं जातं.
कशाप्रकारे धमकी दिली जाते, त्यानंतर काय घडतं?
गेल्या काही दिवसातील घटना पाहिल्या तर दोन प्रकारच्या धमकी दिल्या जातात. एक तर ठराविक विमान असल्याचं सांगितलं जातं. दुसरं, या विमानतळावरील एखाद्या विमानात काही असू असशकत अशी धमकी दिली जाते. अशा प्रकारच्या धमक्यासाठी एक यंत्रणा विमानतळावर असते. यात विमानतळ अथॉरिटी, सीआयएसएफ, बॉम्ब निकामी करणारं पथक आणि इतर सुरक्षा यंत्रणा असतात. या सर्व यंत्रणा नेमका कोणत्या प्रकारचं संकट आहे याची शहनिशा करतात आणि त्यानंतर पायलटला कळवतात. सदर धमकी खरी की खोटी याबाबक अंतिम अहवाल तयार केला जातो.
विमान विमानतळावर असेल तर हे विमान ट्रॉलीच्या सहाय्याने खेचत सुरक्षित ठिकाणी नेलं जातं. त्यानंतर या विमानाची तपासणी केली जाते. पण विमानाचे दरवाजे बंद झाले असतील तर हे विमान उड्डाण घेतल्याचं मानलं जातं. त्यामुळे ही प्रक्रिया आणखी वेगळी असते. सर्वात आधी विमानतळ यंत्रणा एटीसी पायलटला याबाबत माहिती देतात. त्यानंतर पायलट केबिन क्रूला याबाबत कळवतो. केबिन क्रू विमानातील लोकांना याबाबत सांगतात. तसेच सामनांची प्रवाशांच्या माध्यमातून ओळख करून घेतात. जर सर्वकाही व्यवस्थित असेल तर रॅपिड डिसीमार्क केलं जातं. पण अनोळखी वस्तू मिळाली तर क्रू तीनवेळा ‘इव्हॅक्युएशन-इव्हॅक्युएशन-इव्हॅक्युएशन’ असं बोलतो. त्यानंतर सर्व गेट उघडले जातात. आपतकालीन दरवाजा आणि इतर दरवाज्यातून प्रवाशांना उतरवलं जातं. यानंतर सुरक्षा यंत्रणा सदर विमानाची तपासणी करतात.
विमानाने उड्डाण घेतलं असेल आणि धमकीबाबत कळलं तर…
विमानाने विमानतळावरून उड्डाण घेतलं असेल आणि धमकी मिळाली तर विमानतळ यंत्रणा रेडिओ फ्रीक्वेंसीद्वारे पायलटला कळवतात. तसेच जवळपास विमान उतरवण्यासाठी विमानतळ आहे की नाही याची तपासणी करतात. तसेच जवळच्या विमानतळावर विमान उतरवलं जातं. छोट्या विमानासाठी 1.5 किलोमीटरची धावपट्टी लागते. तर मोठ्या विमानासाठी 2.5 ते 3 किलोमीटरची धावपट्टी आवश्यक असते. एकदा का विमान ठरलेल्या ठिकाणी उतरलं की, मग तसेच वर सांगितल्याप्रमाणे तपासणी केली जाते.