भविष्याच्या दृष्टीकोनातून प्रत्येक जण काही ना काही रक्कम वाचवू इच्छितो. भविष्यात एखादं संकट किंवा गरज पडली तर त्या पैशांचा योग्य वापर करता येईल, हा हेतू असतो. छोटी रक्कम बचत करण्यासाठी अनेकदा आरडीचा वापर केला जातो. आरडी म्हणजेच रिकरिंग डिपोझिट.. एक ठरलेली रकम दर महिन्याला भरली जाते. या रकमेवर ठरावीक मुदतीनंतर चांगला व्याज दर मिळतो. आरडीचा पर्याय बँक आणि पोस्ट ऑफिसमध्येही आहे. बँकेच वेगवेगळ्या मुदतीवर ही रक्कम गुंतवू शकतो. तर पोस्ट ऑफिसमध्ये यासाठी पाच वर्षांची मुदत दिली गेली आहे. गुंतवणुकीच्या रकमेवर पोस्ट 6.7 टक्के व्याज देते. त्यामुळे पाच वर्षात एक मोठी रक्कम हातात पडू शकते. तुम्ही 100 रुपयांपासून आरडी सुरु करू शकता. प्रत्येक महिन्याच्या एका ठरावीक तारखेला ही रक्कम भरायची आहे. पण अनेकदा आर्थिक स्थिती खालावल्याने पैसे भरणं होत नाही किंवा पैसे भरायचे राहून जातात. अशावेळी तुमची आरडी बंद होण्याची शक्यता असते. जर तुमचं खातंही असंच बंद झालं असेल तर पुन्हा सुरु करायची धडपड करण्यापूर्वी एकदा प्रोसेस समजून घ्या.
आरडी कधी बंद होते आणि पुन्हा कशी सुरु करायची?
पोस्टात जर तुम्ही सलग चार हप्ते भरताना चुकलात तर तुमचं खातं बंद होतं. पण तुमच्या तेव्हाच लक्षात आलं तर पुढच्या दोन महिन्यात अर्ज करून आरडी पुन्हा सुरु करू शकता. पण बंद खातं सुरु करताना मागचे थकलेले हप्ते ठारावी पेनल्टी भरून जमा करावे लागतात. पण या दोन महिन्यात तुम्ही कोणतीच हालचाल केली नाही तर तुमचं खातं पूर्णपणे बंद होऊन जातं.
हप्ते भरण्यास अडचण आली तर हा पर्याय वापरा
तुमची आर्थिक स्थिती नाजूक असेल आणि हप्ते भरणं कठीण झालं असेल तर तुम्ही तुमच्या आरडीची मुदत वाढवू शकता. यात तुमच्या आरडीच्या ठरलेल्या मुदतीच्या वेळेत आणखी काही महिने वाढवले जातात. म्हणजेच तुम्ही जितके महिने हप्ते भरणार नाही, तितका वेळ आरडीची परिपक्वता मुदत वाढवली जाईल. म्हणजे पाच वर्षांची आरडी असेल आणि तुम्ही चार महिने हप्ते भरण्यास चुकलात. तर पाच वर्षे चार महिन्यांनी आरडी परिपक्व होईल. पण यासाठीही अट आहे. जर तुम्ही चार महिन्यांचे हप्ते भरण्यास चुकलात आणि नंतर या पर्यायाचा वापर करायला गेला तर तसं होणार नाही. यासाठी आर्थिक स्थितीचं आकलन करून आधीच अर्ज देणं गरजेचं असतं.