ग्रहांचा राजा सूर्यदेवांचा वार ‘रविवार’, मानसन्माचं जीवन जगण्यासाठी जाणून घ्या ज्योतिषीय उपाय

0
2
Sun_Set

ग्रहांचा राजा म्हणून सूर्यदेवाला स्थान देण्यात आलं आहे. अर्थात ग्रहाच्या स्वभावानुसार फळं मिळत असतात. सूर्य मानसन्मानाचा कारक ग्रह आहे. त्यामुळे या ग्रहाची कृपादृष्टी राहिली तर मानसन्मान मिळतो अशी ज्योतिषशास्त्रात धारणा आहे. अशा सूर्यदेवाला खरं तर रोज अर्घ्य दिलं पाहीजे. सकाळी उठून स्नान केल्यानंतर पहिल्यांदा गणपतीची आराधना करावी. त्यानंतर लगेचच सूर्यदेवाला अर्घ्य द्यावं. सूर्यदेवांशी निगडीत तांबं हा धातू आहे. त्यामुळे तांब्याच्या गडूतून अर्घ्य दिल्यास शुभ मानलं जातं. इतकंच काय तर अर्घ्य देताना त्यात फुलं, रोली, अक्षता आणि साखर अर्पण करू शकता. अर्घ्य देताना ‘ओम सूर्याय नम:’ या मंत्राचा जाप करावा. नवग्रह स्तोत्रातील ‘जपाकुसुम संकाशं काश्यपेयं महद्युतिं तमोरिसर्व पापघ्नं प्रणतोस्मि दिवाकरं’ या मंत्राचा जप करू शकता. यासोबत रविवारी काही वस्तूंचं दान केलं तर पुण्य लाभतं. तसेच कामात येणाऱ्या अडचणी दूर होतात.

ज्योतिषशास्त्रानुसार रविवारी काय करावं आणि काय करू नये?

रविवारी गूळ, दूध, तांदूळ आणि कपडे दान केल्यास सूर्यदेवांचा कृपाशिर्वाद लाभतो. रविवारी संध्याकाळी मुख्य प्रवेशदाराच्या दोन्ही बाजूस तुपाचे दिवे लावल्याने सूर्यदेवांसोबत माता लक्ष्मीही प्रसन्न होते. त्यामुळे आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते. रविवारी लाल रंगाचे वस्त्र परिधान करणं लाभदायी ठरते, असं ज्योतिषशास्त्र सांगतं. दुसरं म्हणजे, सूर्य आणि शनि हे दोघंही पितापूत्र आहेत. मात्र या दोघांमध्ये विस्तवही जात नाही. त्यामुळे रविवारी शनिशी निगडीत गोष्टी करणं टाळावं. जसं की रविवारी तेल मसाज करू नका. लोखंडी वस्तू या दिवशी खरेदी करणं शक्यतो टाळावं. रविवारी काळे, निळे आणि तपकिरी रंगाचे कपडे घालू नका. तांब्याच्या वस्तू विकणं या दिवशी टाळा. अन्यथा सूर्याचा सकारात्मक प्रभाव कमी होतो.

रविवारी बटवा खरेदी करणं शुभ मानलं जातं. या दिवशी बटवा घेतला तर आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते. पाकीट रिकामी राहात नाही अशी ज्योतिषीय मान्यता आहे. रविवारी लाल रंगाच्या वस्तू खरेदी करणं शुभ असतं. कारण हा रंग सूर्याचं प्रतिनिधीत्व करतो. रविवारी प्रवासाला जाताना पूर्व, उत्तर किंवा आग्नेय दिशेने जावं. तसं नसेल तर या दिशेने सुरुवातीला पाच पावलं टाकावी नंतर पुढचा प्रवास आहे त्या दिशेने सुरु करावा.

रविवार आणि तुळशीचा काय आहे संबंध?

रविवारी तूळशीला पाणी अर्पण केल्यास फायदा होतो. पण या दिवशी तुळशीची पानं तोडणं टाळावं. धार्मिक मान्यतेनुसार, तुळस हे झाड नसून देवी आहे असं मानलं जातं. तसेच तुळशी रविवारी विश्रांती घेत असते. हा दिवस सोडला इतर दिवशी तुळशी भक्तांच्या कल्याणासाठी उपलब्ध असते.

(Disclaimer : ही माहिती पुराण, धार्मिक ग्रंथ, ज्योतिषशास्त्र आणि मान्यतेवर आधारीत आहे. MahaMarathiNews.com या माहितीचं समर्थन किंवा पुष्टी करत नाही.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here