मिळकत आणि खर्च याची दर महिन्याला सांगड बसेल असं नाही. त्यामुळे अनेकदा बिलांचा बोजा डोक्यावर बसतो. पैशांसाठी जवळच्यांकडे हात पसरले की, लोकंही पाठ दाखवतात. त्यांचं तसं करणंही सहाजिकच आहे. कारण प्रत्येकाच्या आयुष्याची आर्थिक गणितं वेगळी असतात. त्यामुळे आपल्या आयुष्यातील गरजा आणि खर्च याचा योग्य मेळ बसवणं गरजेचं आहे. सध्याच्या काळात जमाखर्चाच्या गणितात क्रेडिट कार्ड एक गरज बनली आहे. मेडिक्लेम, टर्म इन्शुरन्स भरण्यासाठी क्रेडिट कार्डचा वापर योग्य रितीने करता येतो. पगारासाठी काही अवधी शिल्लक असेल तर क्रेडीट कार्ड अत्यावश्यक गरज भागवता येऊ शकते. क्रेडिट कार्डच्या माध्यमातून एकप्रकारे शॉर्ट टर्म लोन मिळतं असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. ठरलेल्या वेळेत क्रेडिट कार्डची रक्कम भरली तर त्यावर कोणत्याही प्रकारचं व्याज द्यावं लागत नाही. पण असं करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नाही तर क्रेडिट कार्डाच्या गुंत्यात अडकू शकता.
क्रेडिट कार्डवरून किती रक्कम खर्च करावी
क्रेडिट कार्डवर पगार आणि तुमच्या बिझनेस वॅल्यूनुसार एक पैशांची रक्कम दिली जाते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही मोठी रक्कम या क्रेडिट कार्डवर मिळत असली तर त्याचा 30 टक्क्यांपेक्षा जास्त वापर करू नका. क्रेडीट कार्डच्या माध्यमातून मोठा खर्च करणाऱ्यांना बँका आर्थिकदृष्ट्या कमकुवत समजतात. त्यामुळे तुमचा सिबिल स्कोअर खराब होऊ शकतो. त्यामुळे भविष्यात कर्ज घेताना अडचण येऊ शकते.
क्रेडिट कार्डचं किमान आणि एकूण भरण्याची रक्कम
क्रेडिट कार्डची एक सायकल असते. त्यानुसार दर महिन्याला बिल भरण्याची मुदत असते. एका सायकलमध्ये क्रेडिट कार्डचं बिल भरण्यासाठी साधारणत: 45 दिवसांचा अवधी मिळतो. बिल भरण्याचे दोन प्रकार असतात एक एकूण रक्कम किंवा किमान रक्कम.. एकूण रक्कम म्हणजे तुम्ही त्या महिन्यात क्रेडिट कार्डने जो काही खर्च केला आहे, तो एकत्रित ठरलेल्या वेळेत भरणे. दुसरा पर्याय हा किमान देयकाचा असतो. यात कार्ड ब्लॉक होऊ नये म्हणून किमान रक्कम भरली जाते. पण यात एक फटका बसतो. तो म्हणजे तुम्हाला थकबाकीच्या रकमेवर व्याज भरावा लागतो. त्यामुळे कायम एकूण रक्कम भरणं योग्य ठरतं.
क्रेडिट कार्डने रोख रक्कम काढायची की नाही?
तुम्हाला पैशांची खूप गरज आणि तुम्ही क्रेडिट कार्डने रोख रक्कम काढण्याचा विचार करत असाल तर जरा थांबा. क्रेडीट कार्डच्या माध्यमातून एटीएममधून रोख रक्कम काढता येते. पण यासाठी तुम्हाला काढलेल्या रकमेवर मोठी किंमत मोजावी लागते. कारण रोख रकमेवर क्रेडीट कार्डमध्ये मुदतीचा कोणताही लाभ नाही. रोख काढल्या दिवसापासून व्याजाचं चक्र सुरु होतं.
क्रेडीट कार्ड तात्काळ बंद करू नका
तुमच्या एकापेक्षा जास्त क्रेडीट कार्ड असतील, तर कार्ड पटकन बंद करू नका. कारण क्रेडीट कार्ड बंद केल्याने एका कार्डचा वापर अधिक वाढू शकतो. कारण यापूर्वी हा वापर दोन कार्डात विभागला होता. एकच कार्डवरून मोठी रक्कम वापरली जात असेल तर क्रेडीट स्कोअर खराब होऊ शकतो. त्यामुळे क्रेडीट कार्ड अॅक्टिव्ह ठेवणं गरजेचं आहे.
आंतरराष्ट्रीय व्यवहार करणं टाळा
सध्या तंत्रज्ञानाचं युग आहे. पण या तंत्रज्ञानाच्या युगात आर्थिक फसवणुकीचे अनेक प्रकार घडतात. त्यामुळे अशा ठिकाणी व्यवहार करताना काळजी घेणं गरजेचं आहे. दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रेडीट कार्ड वापरण्यासाठी आकर्षक ऑफर्स दिल्या जातात. पण त्या मागचं गणित पटकन लक्षात येत नाही. तुम्ही विदेशात गेलात आणि कार्ड वापरलं तर तुम्हाला विदेशी चलन व्यवहार शुल्क भरावं लागेल.